गाडी कुठल्याशा स्टेशनवर थांबली. तोवर माझा भाजीपोळीचा रोल संपला होता. पाणी पिऊन झाल्यावर खिडकीतून बाहेर पहावं म्हटलं तर एक वृद्ध आपलं खपाटी गेलेलं पोट दाखवून खायला मागत होता. मला फार ओशाळवाणं वाटलं. एवढी कसली भूक लागली होती आपल्याला? थोडंसं थांबलो असतो तर-? पहिल्यांदाच सोबत डबा घेतला तोही इतका आप्पलपोटेपणानं? पण असा प्रसंग येईल याची कुठे कल्पना होती? त्या आजोबांच्या हातावर पैसे ठेवताना ठरवलं, यापुढे दोन पोळ्या जास्तच घेऊन निघायचं. 'दीन भुकेला दिसता कोणी घास मुखीचा मुखी घालूनी' आपण ईशसेवा करू शकतो ही येशूची शिकवण आठवली आणि निश्चयाची गाठ पक्की झाली.
एकदा नगर-ठाणे प्रवासात टाकळीची नऊवारीतली एक बाई शेजारी येऊन बसली. त्याबरोबर पेरूचा घमघमाट सुटला आणि तोंडून निघालं, 'वा: पेरू!' ती ओळखीचं हसून म्हणाली, 'खाता का? घरचा है.' हो म्हणायला संकोच वाटला. तिनं पिशवीतून पेरू काढला. दोन्ही हातांच्या तळव्यात दाबून त्याचे दोन भाग करून एक मला दिला. पेरू गोड होता. मी म्हटलं 'खा ना तुम्ही पण.' ती समाधानानं हसली. पण पेरू हातात ठेवूनच स्वत:विषयी ती आपणहूनच सांगू लागली. आपलं घर, आपला मळा, आपला नातू... माझ्या हातातला पेरू संपल्यावर आपल्या हातातला अर्धा पुढे करून मी तोही खावा म्हणून आग्रह केला. 'नेकी और पूछ पूछ' म्हणत मी त्याचासुद्धा फडशा पाडला. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की पिशवी कलंडून दुसरा पेरू थेट बसच्या दारापर्यंत गेलाय. ती काही बोलणार तोच तिथेच बसलेल्या छोट्यानं तो उचलून खायला सुरुवातही केली.
'नातवासाठी घेऊन चालला होतात - आम्हीच संपवले.' मी अपराधी सुरात म्हटलं. 'तो काय चरतच असतो. तुमी धाकल्या भैनीसारख्या. तुम्हाला असा पेरू शहरात मिळंल व्हय? अन् त्योबी नातूच की, कुनाच्या तरी मुखात पडलं तं चांगलंच हाय.' तिनं माझीच समजूत घातली.
'तरीपण - गेल्या गेल्या तुम्हाला विचारील तो, 'पेरू नाही आणलेस का?'
'सांगीन त्याला एक भैन अन् एक नातू भेटले व्हते, दिले त्यांना. अन् ताई, या पोरांनी बी शिकायला पाहिजेल तीळसुद्धा सगळ्यात कसा वाटून खायचा ते. 'घेव जाणं पन देव ना जाणं' अशी हैती आताची पोरं.'
तिच्या घरगुती गप्पा पुन्हा सुरू झाल्या. असेल माझ्याच वयाची; पण नवऱ्यामागे मुलीला वाढवणं, तिचं लग्न-संसार, शेतीचा व्याप यात तिची रया गेली होती. आता शेतावर एकटीच राहत होती. म्हणाली. 'या ना कंदी वाट वाकडी करून. टाकळीला उतरा. डावीकडं सरळ चालत आला का इचारा जिजी वाळुंजचा मळा, कुनीबी सांगंल. नक्की या.' म्हणत ती झटकन पिशवी उचलून दाराकडे गेलीसुद्धा. मी लगबगीनं सीटखालची बॅग पुढे ओढली. तिच्या नातवाला एखादं खाऊचं पाकीट द्यावं म्हणून 'अहो थांबा!' म्हणेपर्यंत ड्रायव्हरनं गाडी स्टार्टही केली. इतक्या लवकर तिचा थांबा येईल असं वाटलंच नव्हतं. मी स्वत:वरच चरफडले. हे आधी का नाही सुचलं? पेरूच्या बदल्यात ते देतोय म्हणून तिनं ते घेतलंदेखील नसतं कदाचित. पण तिनं आग्रहानं पेरूचा दुसरा अर्धा भागही आपल्याला खाऊ घातला, तसा आग्रह आपणही तिला करू शकलो असतो की. पण वेळ निघून गेल्यावर सुचून फायदा काय? 'घेण्यापेक्षा देणं श्रेष्ठ असतं' हे बायबल न वाचताही तिला ठाऊक होतं. मी मात्र तत्परतेत याक्षणी ढिली पडले होते.
या प्रवासात मला बहीण मानलेल्या तिचं नाव जिजी होतं. माझी नात मला लहानपणापासून याच नावानं हाक मारते. दोन्ही जिजींना घरी पोहचल्यावर नातवंडांकडून एकच प्रश्ान् येईल - 'जिजी, काय आणलंस?' तेव्हा त्या जिजीच्या हातात आपल्या नातवाला द्यायला काहीच नसलं तरी एक तीळ सात भावांनी वाटून खाल्याचा संस्कार देणारी एक ताजी गोष्ट तिच्याकडे असेल. त्या एका गोष्टीच्या संस्काराच्या अलंकाराने तिचा नातू श्रीमंत होईल. माझ्या बॅगेत खाऊची तीनचार पाकिटं होती. त्यामुळे माझ्या नातीचं तोंड गोड तर झालं असतं पण थोड्या वेळासाठी. माझ्या नातीला एका चांगल्या संस्काराचा अलंकार देण्याची आत्ताची संधी मात्र माझ्याकडून हुकली होती.
- अनुपमा उजगरे
(साहित्यवर्तुळात स्वत:चं स्थान निर्माण करणाऱ्या अनुपमा उजगरे यांनी कथा, कविता, ललित आणि संशोधनपर लेखन केलं आहे. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत. विविध साहित्य संस्थांमध्ये त्या कार्यरत आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट